कोकण पदवीधर मतदार संघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे बंधू प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. भाऊ भाजपात असला तरी, वडिलांमुळे माझी नाळ राष्ट्रवादीशी जोडली असल्यामुळे पक्ष प्रवेश केल्याचे सांगत प्रबोध हे वडिलांच्या आठवणीने भावुक झाले.
कोकण पदवीधर मतदार संघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे बंधू प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात मुंबईत अधिकृत प्रवेश केला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर बोलताना ते भावुक झाले. आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. माझे हृदय भरून आले आहे. माझ्या आयुष्यातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे, असे त्यांनी सांगितले.
ज्या पक्षासाठी माझे वडील वसंत डावखरे यांनी आयुष्यभर झटून काम केले, त्या पक्षात काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी समर्पित केले. माझे वडील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्या काळात त्यांनी मला जवळ बोलावून एकच गोष्ट सांगितली होती, ‘तुला कधी राजकारणात जायचे वाटले, तर राष्ट्रवादी पक्ष कधीही सोडू नकोस. आम्ही शेवटपर्यंत ज्या पक्षासोबत राहिलो, त्याच पक्षासोबत तूही राहा.’ त्या वेळी मी त्यांना शब्द दिला होता की, भविष्यात राजकारणात आलो तर राष्ट्रवादी हाच माझा एकमेव पक्ष असेल. त्यामुळे पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.