ठाणे : वागळे इस्टेट येथील श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या पदाधिकाऱ्याची कोयत्याने आणि लोखंडी सळईने मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशोक कांबळे (४२) असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ८ मे या दिवशी त्यांच्यावर हल्ला झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होता. परंतु मंगळवारी, १९ मे या दिवशी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी अर्जुन कोकणे (५०) याला अटक केली असून त्याचा मुलगा आकाश कोकणे (३०) याचा पोलीस शोध घेत आहेत.
आरपीआय (आठवले गट) पक्षात अशोक कांबळे हे ठाणे जिल्हा युवक आघाडीचे महासचिव होते. वागळे इस्टेट येथील रामनगर परिसरात ते पत्नी अर्चना (३६), मुलगी सिद्धी (११) आणि माही (९) यांच्यासमवेत राहत होते. याच परिसरात अर्जुन आणि आकाश कोकणे हे वास्तव्यास आहेत. अशोक कांबळे या परिसरात सामाजिक काम करत होते. १४ एप्रिल या दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने परिसरात मिरवणूक काढली होती. या मिरवणूकीत आकाश हा महिला नाचत असलेल्या ठिकाणी शिरत होता. त्यामुळे अशोक कांबळे यांनी त्याला हटकले. त्यानंतर आकाश याने त्यांना धमकी दिली होती.
८ मे यादिवशी परिसरातील एका हळदीच्या कार्यक्रमात अशोक कांबळे सहभागी झाले होते. त्यावेळी अर्जुन आणि आकाश या दोघांनी त्यांना हळदीपासून काही मीटर अंतरावर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरड झाल्यानंर त्यांची पत्नी अर्चना या तेथे आल्या असता, त्यांच्यासमोरच आकाश हा लोखंडी कोयत्याने मारहाण करत होता. तर अर्जुन हा लोखंडी सळईने मारहाण करत होता.
या हल्ल्यात अशोक यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी सुरुवातील श्रीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. पोलिसांनी अर्जुन याला अटक केली आहे. तर त्याचा मुलगा आकाश याचा पोलीस शोध घेत आहेत. अशोक यांच्या मृत्यूनंतर परिसरात तणाव आणि संतापाचे वातावरण पसरले आहे