महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
विधान परिषद निवडणुकीसाठी ठाण्यातून महाविकास आघाडीकडून उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नगरसेवक तथा महापालिकेचे गटनेते अभिजीत पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आव्हाड यांनी आगामी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. “महायुतीतील सुरू असलेली कुजबुज आणि अंतर्गत नाराजीच आम्हाला विजय मिळवून देईल. तर उमेदवार अभिजीत पवार यांनी सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला जबाबदारी दिली असून सर्वाचे आशीर्वाद सोबत आहेत असा विश्वास व्यक्त केला.
ठाणे विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगण्याची चिन्हे असून, दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.