ठाणे शहरात गुरुवारी अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी तुळशीधाम परिसरात १९ वर्षीय तरुणाची इन्स्टाग्रामवरील वादातून निर्घृण हत्या करण्यात आली, तर रात्री तलावपाली परिसरात एका माथेफिरूने इसमाच्या डोक्यात दगड घालून त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास तुळशीधाम परिसरात सोशल मीडियावरील वादातून १९ वर्षीय तरुणावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर रात्री सुमारे १० वाजता ठाण्यातील गजबजलेल्या तलावपाली परिसरात आणखी एक खून झाला. एका माथेफिरूने इसमाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अवघ्या एका दिवसात दोन खुनांच्या घटनांनी ठाणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालली आहे का, तसेच गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहिला नाही का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दोन्ही घटनांप्रकरणी पोलीस तपास सुरू असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.