ठाणे, ता. १ : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी आणि महायुतीमधील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात जाऊन स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले.
यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार माधवी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदुराव,आमदार कुमार आयलानी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी रिपाइंचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रतिसादामुळे रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित असून ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, संबंधित मतदारसंघांमध्ये महायुतीचे प्राबल्य असून बहुमतही महायुतीकडे आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुती मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.