ठाणे प्रतिनिधी:- ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला गुरुवारी पहाटे १.२८ वाजण्याच्या सुमारास नगरसेवक संजय वाघुले यांनी फोन करून गावदेवी भाजी मार्केट इमारतीत आग लागल्याची माहिती दिली. या मार्केटमध्ये लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच अग्निशमन गाड्या, तीन जम्बो वॉटर टँकर, दोन वॉटर टँकर, चार रेस्क्यू वाहने, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, महावितरण कर्मचारी, नौपाडा पोलीस तसेच रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. अतिरिक्त आयुक्त रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, जी.जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एस. वाय. तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रभाग समिती कार्यालयातील सुरक्षा रक्षक काळू गाडेकर हे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अडकले होते. काळू आणि अग्निशमन दलाचे जवान तासभर मोबाईलवर संपर्कात होते आणि ते नेमके कोणत्या बाजूला आहेत याची माहिती घेत होते. आगीत अडकलेल्या सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे आत गेले होते. अखेर त्यांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र धुरामुळे गुदमरल्याने काळू गाडेकर आणि जवान सागर शिंदे या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.