शहापूर नगरपंचायतीच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी आज ठाणे येथे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
शहापूर नगरपंचायत महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार स्थापन झाल्यानंतर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सन १९८३ मधील जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याने नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे. शहराची भावी वाढ व सन २०४४ पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेऊन भातसा नदी या स्त्रोतावर आधारित नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली असल्याचे आ. डावखरे यांनी निवेदनात नमूद केले.
नगरपंचायतीने आवश्यक ठराव करून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, काही खासगी प्रकल्पांचे पाणी आरक्षण रद्द झाल्यानंतर उपलब्ध झालेल्या सुमारे २.५७ दलघमी/वर्ष पाणी आरक्षण शहापूर नगरपंचायतीस देण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. हा प्रस्ताव अत्यंत लोकहिताचा असल्याने त्यास तातडीने मंजुरी देऊन पुढील कार्यवाही करण्याची मागणी आ. ॲड. निरंजन डावखरे यांनी केली.
मंत्री गिरीश महाजन यांनी या विषयाची दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शहापूर शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असून नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास आ.ॲड. निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.