ठाणे शहर ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दावे प्रशासनाकडून सातत्याने केले जात असताना प्रभाग क्रमांक १३ मधील सार्वजनिक सुविधांची अत्यंत धक्कादायक अवस्था समोर आली आहे. या प्रभागातील अनेक सार्वजनिक शौचालयांना दरवाजे नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून यावरून नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.
या संदर्भात नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी संबंधित विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून शौचालयांना दरवाजे बसविण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने या पत्रव्यवहाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रभागातील १० सार्वजनिक शौचालयांपैकी केवळ २ शौचालयांनाच दरवाजे असून उर्वरित शौचालये दरवाजेविना असल्याचे वास्तव समोर आले आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महिलांच्या शौचालयांनाही दरवाजे नसल्यामुळे महिलांना अत्यंत अपमानास्पद परिस्थितीत शौचालयाचा वापर करावा लागत आहे. अनेक महिलांना स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी हातात लाकडी प्लाय धरून शौचालयाला बसावे लागत असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे. “ठाण्यातील लाडक्या बहिणींना अब्रू वाचवण्यासाठी हातात प्लाय धरून शौचालयाला बसावे लागते, ही ठाण्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया खुस्पे यांनी दिली.
याशिवाय या शौचालयांमध्ये पाणी आणि वीज यांची कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, या प्रकरणाला राजकीय रंगही चढला आहे. “प्रभाग क्रमांक १३ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी एकटाच नगरसेवक आहे, तर उर्वरित तीन नगरसेवक धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले आहेत. यामुळे जाणीवपूर्वक मला डावलण्यासाठी प्रशासनाकडून या प्रभागातील कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे,” असा गंभीर आरोपही नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी केला.
“एकीकडे ‘स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे’ आणि स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले जात आहे; मात्र प्रत्यक्षात महिलांच्या शौचालयांनाही दरवाजे नाहीत. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या शौचालयांना दरवाजे बसवावेत, तसेच पाणी व वीज व्यवस्था सुरू करावी. अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी दिला आहे.