ठाणे (10) : विशेष मुलांना स्वावलंबी करण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायमच पाठीशी राहील. तसेच या मुलांच्या सर्वांगीण विकासाठी ज्या योजना असतील त्या योजनांचा लाभ या विद्यार्थ्याना मिळावा यासाठी नेहमीच सहकार्य राहील असे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जागतिक दिव्यांगदिनी नमूद केले.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनाचे आयोजन आज राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपायुक्त उमेश बिरारी, दिव्यांग कला प्रतिष्ठानचे किरण नाक्ती आदी उपस्थित होते.
दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणणे यासाठी ठाणे महापालिका, दिव्यांग कला केंद्र राबवित असलेल्या उपक्रमाचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कौतुक केले.
व्यंगत्वावर मात करुन आपल्यात असलेले कलागुण रसिकांसमोर सादर करत दिव्यांग मुलांनी रसिकांची वाहवा मिळविली. यावेळी नृत्य,गायन, समूह गायन सादर अशा विविध कलाप्रकार सादर करताना मुलांमधील जिद्द आणि आत्मविश्वासाचा सुंदर अविष्कार पाहायला मिळाला.
सुरूवातीला ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रार्थना सादर केली. दिव्यांग कला केंद्राच्या विजय जोशी यांनी ‘अथर्वशीर्ष’ सादर केले. तसेच यंदाच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे संपूर्ण कार्यक्रम हा पर्यावरणावर आधारित ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ या शीर्षकाखाली करण्यात आला. ‘मी निसर्ग बोलतोय’ या नाटिकेच्या माध्यमातून मुलांना पर्यावरणाचा संदेश दिला. यात दिव्यांग कला केंद्राचे संकेत भोसले, अपूर्वा दुगुळे, अन्मय मंत्री, अपर्णा महाबळे, जान्हवी कदम, कार्तिक रामाणे, गौरव राणे, रेश्मा जेठवा, आरती पाटे हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
तद्नंतर पल्ल्वी पाटील हिने ‘मोगरा फुलला’, ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘श्रावणात घननिळा’, श्रुतिका भोईर हिने ‘नाच रे मोरा’, ऋतुजा गांधी हिने ‘बीज अंकुरे अंकरे’, ‘गारवा’ आदी एकापेक्षा एक गाणी सादर केली. तर धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘जा रे हट नटखट’ या गाण्यावर नृत्य सादर केले. यात रुद्राक्षी पवार, अर्पिता चव्हाण, आशिषकुमारी शर्मा, श्रेया यादव, अथर्व ठोंबरे, साकेत झा, नानक वाळुंज, तेजस परब आदी विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराजे ‘जन्मोत्सव ते राज्याभिषेक’, लावणी, तबला वादन आदी विविध कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले. तसेच यावेळी ठाणे शहरात दिव्यांगासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.