दि.०८, ठाणे (जिल्हा परिषद, ठाणे)- केंद्र व महाराष्ट्र शासनाने सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसार साध्य करण्याचे ध्येय जाहीर केले असून त्यानुसार संपूर्ण राज्यभर कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातही ही मोहीम जिल्हाधिकारी ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे पार पडली. ग्रामीण भागामध्ये १०० टक्के तसेच जोखीमग्रस्त शहरी भागांमध्ये मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेचा मुख्य उद्देश समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधणे, त्यांना त्वरित बहुविध औषधोपचार (MDT) सुरू करणे, नवीन सांसर्गिक रुग्णांमुळे होणारी संसर्गाची साखळी खंडित करणे आणि जनजागृतीद्वारे कुष्ठरोगाविषयीची भीती व गैरसमज दूर करणे हा होता. सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसार साध्य करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मनीष रेंगे यांनी सांगितले.
कुष्ठरोगाची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असून त्वचेवर फिकट अथवा लालसर बधिर चट्टे, त्या ठिकाणी घाम न येणे, त्वचेवर गाठी, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवया विरळ होणे, तळहात व तळपायांमध्ये मुंग्या किंवा बधिरपणा, हातांचे किंवा पायांचे बोटे वाकडी होणे, संवेदनांचा अभाव, चालताना चप्पल गळणे, वस्तू हातातून पडणे अशी लक्षणे आढळू शकतात. अशा लक्षणांवर त्वरित उपचार न झाल्यास विकृती निर्माण होऊ शकते, त्यामुळे लवकर निदान अत्यंत आवश्यक आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात या मोहिमेदरम्यान एकूण १ हजार ५८ टीमच्या माध्यमातून १३ लाख ९५ हजार ७३८ लोकांची तपासणी करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी ३ लाख ३४ हजार ७१५ घरभेटी दिल्या. तपासणीमध्ये ७ हजार ३९२ संशयित रुग्ण आढळले, त्यापैकी ६,०७८ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि १०५ नवीन कुष्ठरुग्ण निदान झाले. ग्रामीण भागातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि कल्याण तालुक्यांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या कव्हर करण्यात आली असून शहापूर व भिवंडी तालुक्यांत सर्वाधिक निदान झालेल्या प्रकरणांची नोंद झाली.
जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रांमध्ये २ हजार ४३१ टीममार्फत ९ लाख २२ हजार ९६० घरांना भेटी देण्यात आल्या व ३९ लाख ८० हजार २५८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामधून २४ हजार २३९ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी २० हजार ९५६ जणांची तपासणी केल्यानंतर ८५ नवीन कुष्ठरुग्णांचे निदान झाले. जिल्ह्यामध्ये ग्रामीण, शहरी, महानगरपालिका, नगरपालिका पकडून एकूण १८६ कुष्ठरुग्ण आढळले आहेत.
ही संपूर्ण मोहीम आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, महापालिका आरोग्य विभाग, आशा सेविका, आरोग्य सहाय्यक, स्वयंसेवी संस्था व स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि त्यावर मोफत औषधे उपलब्ध आहेत, हे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात या मोहिमेचा मोठा वाटा ठरला आहे.