ठाणे जिल्हा परिषदेचा २०२६-२७ या वर्षासाठी ११६.९९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी बुधवारी बी. जे. हायस्कूल येथील सभागृहात सादर केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर आदी उपस्थित होते. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागात नाविन्यपूर्ण योजना तसेच मिशन भरारी अंतर्गत विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
या उपक्रमांसाठी अर्थसंकल्पात ११.३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. किशोरवयीन मुलींसाठी ‘पिंकरुम’ योजना राबविली जाणार असून त्यासाठी २५ लाख रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तसेच शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय शाळांमध्ये क्रीडा साहित्य, स्वच्छता साहित्य देण्याबरोबरच सुरक्षिततेसाठी सिसिटिव्ही यंत्रणा बसविली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यासाठी तसेच गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण योजना ‘मिशन भरारी’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे