Thane News9:-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात चर्चेला उधाण
ठाणे : पुणे शहरानंतर आता ठाण्यातही “दाराला नीट कडी लावा, हाकामारी येणार आहे” अशा आशयाचे पोस्टर विविध ठिकाणी झळकू लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे स्थानक परिसर, प्रमुख चौक, बाजारपेठा तसेच रहदारीच्या ठिकाणी ही पोस्टर लावण्यात आल्याचे दिसून येत आहे.
या पोस्टरवर कोणत्याही संघटना, राजकीय पक्ष किंवा व्यक्तीचे नाव, चिन्ह अथवा संपर्क क्रमांक नसल्याने नेमके हे पोस्टर कोणी आणि कोणत्या उद्देशाने लावले आहेत, याबाबत गूढ कायम आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही या पोस्टरची चर्चा रंगू लागली असून, नागरिक वेगवेगळे तर्क-वितर्क लावत आहेत.
सध्या निवडणुकीचा काळ सुरू असल्याने, या पोस्टरचा राजकीय संदर्भ आहे का, की केवळ भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही नागरिकांनी या पोस्टरमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे, तर काहींनी याकडे अफवा किंवा कोणाचा तरी स्टंट म्हणून पाहिले आहे.
पुण्यानंतर ठाण्यातही अशा प्रकारे एकसारखी पोस्टर आढळून आल्याने, हे एखाद्या संघटित मोहिमेचा भाग आहे का, यावरही चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.