ठाणे प्रतिनिध :- येऊर परिसरात माकडांवर हल्ल्याच्या सलग दोन घटना समोर आल्याने वनविभाग सतर्क झाला आहे. धनुष्य-बाणाने माकडांना जखमी करण्यात आल्याची बाब उघडकीस आली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेले माकड हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची-१ मधील संरक्षित प्राणी असल्याने या घटनेला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.
वनविभागाने आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून नागरिकांची मदतही मागवण्यात आली आहे. या घटनेत सामील आरोपींबाबत कोणतीही माहिती असल्यास ती वनविभागाला कळवावी. माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असून त्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन वनविभागाने केले आहे. वनक्षेत्रपाल संतोष डगळे आणि वनपाल सी. जे. खांडवी यांना नागरिकांनी ९८९२६८४२६६ आणि ९३७०११४३९९ या क्रमांकांवर तत्काळ संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.