ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सोनसाखळी चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविंद्र पाटील आणि त्यांचे पथक हे नारपोली पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. त्यावेळी इराणी टोळीतील कल्याण येथील आंबिवली परिसरात राहणाऱ्या अब्बास (बड्डा) याचे नाव समोर आल्यानंतर पथकाने त्याचा शोध सुरु केला.
अब्बास हा कर्नाटक येथील बिदर भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्याला बिदर येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने ठाणे, मुंब्रा, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ भागात २० गुन्हे केल्याची कबूली त्याने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून २३२.५ ग्रॅम वजनाचे ३० लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. अब्बास हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती पथकाने दिली.