
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर भागातील एका बंगल्यामध्ये भानुप्रसाद सिंह (५०) यांची हत्या झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला. बंगल्याची देखभाल करणाऱ्या राजकुमार यादव (२७) याने ही हत्या केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर भागात एका व्यवसायिकाचा बंगला आहे. या बंगल्याच्या देखभालीचे काम राजकुमार यादव हा करत असतो. २ डिसेंबरला रात्री पार्टीनिमित्ताने त्याने भानुप्रसाद याला बोलावले होते. मद्य प्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाले. या वादातून त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
या वादानंतर यादव याने भानुप्रसाद याच्या डोक्यात फरशी पुसण्याच्या माॅपच्या दांड्याने डोक्यात प्रहार केले. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर यादव हा तेथेच थांबला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी यादव याला ताब्यात घेऊन अटक केली.