filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 42;
ठाणे, प्रतिनिधी
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीची घोषणा केली असली तरी, भाजप कार्यकर्त्यांनी युतीच्या विरोधात दंड थोपटले असुन विविध मंडलांमध्ये मेळाव्याद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात कोपरी भाजपच्या मंडळ अध्यक्षांनी युती विरोधात पहिली ठिणगी टाकल्यानंतर कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही युती झाल्यास ५० टक्के जागांची मागणी केली आहे. अन्यथा, स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर ठाण्यातील प्रभाग क्रमांक १९ मधील भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गेल्या ८ वर्षांत शिंदेंच्या शिवसेनेच्या शिवसेनेच्या नगरसेवक,पदाधिकारी यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलेली मारहाण, दाखल केलेले गुन्हे,समाजकार्यात केलेले हस्तक्षेप, दादागिरी, युती धर्मात टाकलेला मिठाचा खडा अशा अनेक कृष्णकृत्यांचा पाढा भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या समक्ष वाचला. यावेळी भाजपा उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांनीही शिवसेनेच्या कारभारावर नाराजी दर्शवत युती केल्यास भाजपला समसमान हक्क मिळावा, अशी मागणी केली. यावेळी आमदारांनी देखील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. सबुरीने घ्या, तुमच्या भावना वरिष्ठांकडे मांडल्या जातील असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असले तरी दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक होत असल्याने ठाण्यात भाजप-शिवसेनेत कुस्ती रंगल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप श्रेष्ठी आपल्या आक्रमक कार्यकर्त्यांची नाराजी कशाप्रकारे दूर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.