हिंदू मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर ठाणे शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने निघालेल्या या यात्रेत मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
परंपरेनुसार सकाळी ७ वाजता कौपिनेश्वर मंदिर येथून पालखीचे वाजत-गाजत प्रस्थान झाले. जांभळीनाका येथील सिद्धीविनायक मंदिर येथे दर्शन घेऊन पालखी मासुंदा तलाव परिसरात पोहोचली. याठिकाणी विविध संस्थांचे आकर्षक चित्ररथ एकत्र येत यात्रेला अधिक रंगत आली.
दरम्यान, ठाण्याचे सुपुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या स्वागत यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवला. कौपिनेश्वर मंदिरापासून जांभळी नाका चौकापर्यंत त्यांनी स्वतः पालखी वाहत परंपरेचा सन्मान राखला.
यानंतर चिंतामणी चौकात क्रेनच्या माध्यमातून पालखीवर आणि संपूर्ण स्वागत यात्रेवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच, चिंतामणी चौकापासून गोखले रोडपर्यंत शिंदे यांनी पायी चालत सहभाग घेत ठाणेकरांचे मन जिंकले