दिग्दर्शक संजय जाधव आणि अभिनेता सौरभ गोखले यांचे संघ एकमेकांना भिडणार
ठाणे, दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रंगणार क्रिकेटचा थरार
ठाणे: भारतातील क्रिकेट रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या प्रेसिडेंट कप २०२६ मध्ये आता सिने अभिनेते आणि अभिनेत्री खेताना दिसणार आहेत. ‘क्लॅश ऑफ सेलिब्रिटीज, क्लॅश ऑफ सुपरस्टार्स’ या टॅगलाईनसह सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आता क्रिकेटच्या मैदानात आपली क्रिकेट कला दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर उद्या, ४ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता हा हाय-व्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. या विशेष सामन्यात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक संजय जाधव आणि लोकप्रिय अभिनेता सौरभ गोखले यांचे दोन स्वतंत्र संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
इंडियन टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि फेडरेशनचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. उदय रवींद्र सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेसिडेंट कपचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ मार्च रोजी या स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सध्या राज्यातील विविध टेनिस क्रिकेटचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यांच्या अगदी चुरशीचे सामने पहायला मिळत आहेत. याला क्रिकेट चाहते आणि संघांच्या पाठीराख्यांचाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. याच स्पर्धेत आता सेलिब्रिटींमध्ये सामना रंगणार आहे. प्रेक्षकांना आपल्या लाडक्या कलाकारांना टेनिस क्रिकेट सामना खेळताना पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
चित्रपट आणि मालिकांमधील नामवंत कलाकार आपल्या संघासह मैदानात उतरणार आहेत. अभिनेता सौरभ गोखले आणि निर्माता, दिग्दर्शक संजय जाधव यांचे संघ शनिवार, ४ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता दादोडी कोंडदेव स्टेडियममध्ये एकमेकांना भिडतील. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अनोखी पर्वणी मिळणार आहे.
सौरभ गोखले यांच्या संघात कल्याणी जाधव, ऋतुराज फडके, माधव देवचके, शुभंकर तावडे, आदिश वैद्य, तेजस बर्वे, अमोल नाईक, महेश लिमये, सक्षम कुलकर्णी, मंगेश बोरगावकर, राजेश भोसले, देवेंद्र शेलार, अभिलाष चौधरी आणि तेजस नेरुरकर यांसारख्या नामवंत कलाकारांचा समावेश आहे.
तर दिग्दर्शक संजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील या संघात संजना पाटील, हर्षद अतकरी, पृथ्वीक प्रताप, शशांक केतकर, सिद्धार्थ बोडके, ओमप्रकाश शिंदे, अभिनय बेर्डे, अक्षय केळकर, सुशांत शेलार, उमाकांत पाटील, विवेक सांगळे, रोहित शिवलकर, सुयश टिळक आणि विनय राऊत हे कलाकार मैदानात उतरणार आहेत.
क्रीडाप्रेमींसाठी मेजवानी
टेनिस क्रिकेटच्या या महाकुंभात मनोरंजन विश्वातील हे तारे-तारका केवळ उपस्थित राहणार नसून, प्रत्यक्ष मैदानात घाम गाळणार आहेत. हा सामना ‘टेनिस क्रिकेट’ फॉरमॅटमध्ये होणार असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात चौकार आणि षटकारांची आतिशबाजी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. तरी क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेलिब्रिटी सामन्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी माहिती:
- ठिकाण: दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे.
- दिनांक: ४ एप्रिल २०२६
- वेळ: संध्याकाळी ५:००