शनिवारी रात्री येथील शिंदे गटातील इच्छुक प्रमोद गोगावले यांच्यासह त्यांचे काही कार्यकर्त्यांनी प्रमोद गोगावले यांना उमेदवारी मिळावी यासाठी आनंदनगरमध्ये घोषणाबाजी केली. मागील ३५ वर्ष मी प्रभागात काम करत आहे. नुकतीच मंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट घेतली आहे. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. त्या निर्णयास मी बांधील असे. माझा संपर्क क्रमांक हा २४ तास सुरु असतो. कुठलीही अडचण आल्यास समोरील व्यक्तीला कशी मदत करता येईल यासाठी मी प्रयत्न करत असतो असे या प्रभागातील इच्छूक प्रमोद गोगावले यांनी सांगितले.
शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी देण्यास विरोध होऊ लागला असून शनिवारी रात्री येथील शिंदे गटाच्याच कार्यकर्त्यांनी येथील प्रमोद गोगावले यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. प्रमोद गोगावले हे भरत गोगावले यांचे कार्यकर्ते आहेत. काही दिवसांपूर्वीच माजी नगरसेवक संजय भोईर यांच्या भावाला उमेदवारीवरुन अशाचप्रकारे विरोध झाला होता. त्यामुळे आता शिंदे गटातील गटबाजी चव्हाट्यावर येत आहे.
नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष म्हस्के हे महापालिका निवडणुकीसाठी तयारी करत होते. नरेश म्हस्के खासदार झाल्याने इतर पदाधिकारी देखील उमेदवारी मिळेल या आशेवर होते. त्यामध्ये मंत्री भरत गोगावले यांचे कार्यकर्ते प्रमोद गोगावले यांचाही सामावेश होता. परंतु आता या प्रभागातून आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह निर्माण झाल्याने शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.