मुंब्रा येथे २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास डीसीबी बँकेसमोरील खाडीमशीन रोडवर,फरजाना मोहम्मद फिरोज मन्सुरी या त्यांच्या दोन मुलींसह रस्ता ओलांडत असताना, एक अनोळखी बुरखाधारी महिलेने तीन महिन्यांची मुलगी आफिया हिला “मी समोरच जाते” असे सांगून मांडीवर घेतले व संधी साधून पळ काढला. याप्रकरणी बालिकेच्या आई वडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार केली. याबाबत लगेचच पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला. गुन्हा दाखल होताच चार स्वतंत्र तपास पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला.
घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता अपहरण करणारी महिला रिक्षाने मुंब्रा स्टेशनपर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात ती महिला एका पुरुषासह मुंबईच्या दिशेने लोकलने प्रवास करत असल्याचे आढळून आले. ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला आदी स्थानकांवरील सीसीटीव्ही तपासून संशयितांची हालचाल टिपण्यात आली. तपासाची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी बाळाचे कपडे व स्वतःचा पेहराव बदलल्याचेही उघड झाले. दरम्यान, आरोपींसोबत असलेल्या आणखी एका महिलेचा माग काढत पोलीस पथक इन्शानगर, शादी महल परिसरात पोहोचले. तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची साथीदार नसरीन इकलाख शेख हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्या चौकशीत अपहृत बाळ अकोला जिल्ह्यातील खेटरी तालुका पातूर येथे असल्याचे निष्पन्न झाले.
तत्काळ पोलिस पथक अकोला येथे रवाना झाले असता मोहम्मद मुजीब गुलाब (वय ३१) व त्याची पत्नी खैरुन्निसा मुजीब मोहम्मद (वय ३०) यांना अटक करण्यात आली. अपहरण झालेली चिमुकली आफिया हिला सुखरूप ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण कारवाईदरम्यान मुंब्रा ते सीएसएमटी तसेच मुंब्रा ते वांगणी दरम्यानच्या शेकडो सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. सहा दिवस सलग दररोज सुमारे १८ तास चाललेल्या तपासातून हा गंभीर गुन्हा उघडकीस आला.