ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेतील बंडखोरीमुळे मानपाडा, कोलशेत या भागातील प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे. असे असतानाच, याच प्रभागातून निवडणूक लढवीत असलेल्या शिंदे सेनेच्या ठाणे महिला जिल्हा प्रमुख, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेचे आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत पोलीस कारवाईच्या धमक्या दिल्या आहेत. त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे. या प्रभागात आगरी समाज वास्तव्यास असून ऑडिओ क्लिपमुळे मीनाक्षी शिंदे या नव्या वादात सापडल्या आहेत.
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या ऑडिओ क्लिपमधील संभाषणात मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे आगरी समाजात तीव्र नाराजीचा सूर उमटत असून या वक्तव्याचा जाहीर निषेध केला जात आहे.
ऑडिओ क्लिपसोबत एक संदेश प्रसारित केला जात असून त्यात पायाखालची जमीन खचली आहे म्हणून धमक्यांची भाषा केली जात आहे. मात्र नागरिक या धमक्यांना भीक घालणार नाही, असे म्हटले आहे.