मुंबई:न्यायालयाने दोषी ठरवून कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा कायम केल्यानंतर नाशिक पोलिसांनी अटक वॅारंट जारी केले होते. मंत्र्यांवरच अटक वॅारंट जारी झाल्याने महायुती सरकारची कोंडी झाली होती. कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी अजित पवारांवर दबाव वाढला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांमध्ये चर्चा झाली होती. अजित पवार कोकाटेना अभय देत असल्याचे सांगण्यात येत होते. कोकाटे यांच्याकडील दोन्ही खाती काढून घेण्याची शिफारस करणारे पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवले होते. त्यानुसार राज्यपालांनी खाती काढून घेतली.
शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती बुधवारी रात्री काढून घेण्यात आली. कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
कोकाटे यांच्याकडील क्रीडा व अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपविण्यात आल्याचा आदेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी रात्री उशिरा जारी केला.