ठाणे:- पोखरण रोड क्रमांक दोन येथील बेथनी रुग्णालयाच्या मागील बाजूस गृहसंकुले आहेत. येथील एका गृहसंकुलाजवळील झुडपामध्ये गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बिबट्या बसल्याचे एका महिलेला आढळले. तिने तात्काळ त्याचे मोबाईल चित्रीकरण तयार केले. गृहसंकुलातील रहिवाशांना हे चित्रीकरण प्राप्त झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वन विभाग आणि पोलिसांना दिली.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वन विभागाने परिसरात जनजागृती केली. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर परिसरापासून काही मीटर अंतरावर असल्याने बिबट्या तेथून आला असावा अशी शक्यता वन विभागाने व्यक्त केली.
पोखरण रोड क्रमांक दोन येथील एका गृहसंकुलाजवळ गुरुवारी बिबट्या आढळून आला. त्याचे मोबाईल चित्रीकरण प्रसारित प्रसारित झाल्यानंतर वन विभाग, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने बिबट्याचा शोध घेतला असता, बिबट्या आढळून आला नाही.
बिबट्या आढळून आलेला परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर जंगलापासून अवघ्या ५०० ते ६०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे हा बिबट्या तेथून आला असावा असा अंदाज वन विभागाला आहे. बिबट्या आता त्या भागात आढळला नाही. त्यामुळे तो पुन्हा जंगलात निघून गेला असावा अशी शक्यता देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
वन विभाग, पोलीस कर्मचारी परिसरात दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना बिबट्या किंवा त्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाही. वन विभागाने परिसरात कॅमेरे, पिंजरा बसविला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पथकाने रहिवाशांमध्ये जनजागृती केली. बिबट्या आल्यास काय करावे आणि काय करु नये याची माहिती रहिवाशांना दिली. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.