- अवैध पब, लाउंज बार, हुक्का, हाॅटेल, रेस्टाॅरंट, डान्सबारवर कारवाई करा
- मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचे ठाणे पालिका आयुक्तांना पत्र
ठाणे, दि. (प्रतिनिधी). उत्तर गोव्यात गर्दीने भरलेल्या नाइटक्लबला शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. डान्स फ्लोअरजवळ फोडलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागल्याचे प्राथमिकरित्या केलेल्या चौकशीत समोर आले. ठाण्यातही विविध माॅल, वाणिज्य गृहसंकुल, मानपाडा येथील कोठारी कंपाउंड, हिरानंदानी इस्टेट, मेडोज, वागळे इस्टेट परिसरातील अवैद्य लाउंज व हुक्का पार्लरमध्ये तसेच हाॅटेल, रेस्टाॅरंट, डान्सबार याठिकाणी अग्निशमन दलाची कोणतीच परवानगी घेतली नसल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली.
उत्तर गोव्यात नियमांची अंमलबजावणी करण्यात सरकारी अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्याचेही समोर आले आहे. डान्स फ्लोअरवर नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आग लागल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. तेव्हा किमान १०० लोक डान्स फ्लोअरवर होते आणि आगीतून वाचण्याच्या प्रयत्नात, त्यापैकी काही जण खाली स्वयंपाकघरात पळून गेले. तिथे ते कर्मचाऱ्यांसह अडकले. आगीचा भडका उडाल्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले. अनेक जण तळमजल्यावर आणि स्वयंपाकघरात अडकले होते. विशेष म्हणजे, याठिकाणी एका तात्पुरत्या बांधकामाने सहज पेट घेतल्याने आग पसरत गेली आणि काही वेळातच संपूर्ण क्लब आगीत जळून खाक झाला. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला. ठाण्यात महानगरपालिका प्रशासन, अग्निशमन दल, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क खात्यासह पोलिस प्रशासनातील अधिकार्यांच्या संगनमतपूर्वक हेतूमुळे अशा आस्थापनांमध्ये अग्नितांडव होण्याची भीती आहे. तसेच या परिसरात अवैधरित्या होणार्या तात्पुरत्या बांधकामाने गोवा अग्निकल्लोळ दुर्घटनेची पुनरावृत्ती निश्चितच होऊ शकते. हे प्रकार सुसंस्कृत ठाणे शहरात टाळण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई आवश्यक असल्याचे मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रात नमूद केले.