(ठाणे, प्रतिनिधी. /सिद्धेश पन्हाळे)
ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील लॉजमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीमुळे सामाजिक संतुलन बिघडून स्थानिक महिला व बालिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. या निषेधार्थ मंगळवारी रात्री शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीने यल्गार पुकारत भव्य मोर्चा काढुन कोपरी पोलिसांच्या निष्क्रीयतेचा पाढा वाचला. सेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील, महिला विभागप्रमुख मनीषा शिंदे, निर्मला काळेआदींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेकडो महिला आघाड़ी सहभागी झाल्या होत्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या कोपरी-पाचपाखाडीतील ठाणे पुर्वेकडील लॉज तसेच अन्य काही ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून देहविक्री व अनैतिक व्यवसाय सुरू आहेत. या लॉजमधील काही वेश्या लॉज बाहेरच्या रस्त्यावर व पदपथावर उभ्या राहुन ग्राहकांना इशारे करतात. या रस्त्यावर धार्मिक देवस्थाने, महिलांचे विशेष हॉस्पिटल आणि मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीयांची वस्ती आहे. तसेच शाळेमध्ये मुलांना घेऊन जाणाऱ्या महिलांची वर्दळ असते. या महिलांनाही कामांध ग्राहकांकडून अश्लिल भाषेत विचारणा केली जाते. त्यामुळे महिला वर्गाची कुचंबणा होत आहे. काही वेळा पोलिसांकडून थातुरमातुर कारवाई केल्यानंतर लॉज मालक या वारांगनाना जामिनावर सोडवितात. त्यानंतर ह्या वारांगना पुन्हा रस्त्यालगत उभ्या राहत असल्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकाराविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीकडून तीव्र संताप व्यक्त्त करण्यात आला. मंगळवारी रात्री भव्य मोर्चा काढून पोलिसांच्या निष्क्रीयतेचा पाढा वाचण्यात आला. ज्या विभागाचे हे काम आहे त्यांनी गांभिर्यपुर्वक याविरोधात कारवाई केली पाहीजे, असे मत सेनेच्या रणरागिणीनी व्यक्त ककेले. तसेच संबंधित लॉजवर पोलिसांनी अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. हे प्रकार असेच सुरु राहिले तर येणाऱ्या काळात कायदा हातात घेवू असा इशारा देण्यात आला.