ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात पवित्र रमजान महिन्यानिमित्त सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देणारा एक भव्य कार्यक्रम पार पडला आहे. एम के ग्रुप ऑफ कंपनीज आणि सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक खोखर यांच्या वतीने दावत-ए-इफ्तारचे शानदार आयोजन करण्यात आले होते.
रमजान हा संयम, त्याग आणि बंधुभावाचा महिना मानला जातो… आणि याच पार्श्वभूमीवर आयोजित या इफ्तार सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने खजूर, ताजे फळे, शरबत आणि विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे उपवास सोडत एकात्मतेचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला माजी महापौर अशोक वैती, ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ भोईर, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव, तसेच झोन १ चे उपायुक्त बोरसे यांच्यासह अनेक मान्यवर, पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी रमजान महिन्याचे महत्त्व अधोरेखित करत समाजात बंधुभाव, शांतता आणि एकात्मता टिकवण्याचे आवाहन केले. अशा कार्यक्रमांमुळे विविध समाजघटकांमध्ये संवाद वाढून सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो, असे मतही व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. शेवटी आयोजक मुश्ताक खोखर यांनी उपस्थितांचे आभार मानत भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.