पुन्हा एकदा VVIP सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणाचा आरोप
भिवंडी : राज्यातील व्हीव्हीआयपी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी हे भिवंडी येथे न्यायालयीन कामकाजानिमित्त जात असताना मुलुंड चेक नाका येथे त्यांच्या ताफ्यासमोर काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत रस्ता अडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेच्या सतर्कतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत “घात की अपघात?” असा प्रश्न उपस्थित करत काहींकडून आधीच सुरक्षा व्यवस्थेवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर आज घडलेली घटना अधिकच गंभीर मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी न्यायालयात हजर राहण्यासाठी भिवंडीत आले असताना , ठाणे मुलुंड दरम्यान चेक नाका येथे त्यांच्या वाहन ताफ्यासमोर काही सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी अचानक येत काळे झेंडे दाखविले आणि रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. या घटनेदरम्यान पोलीस यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणताना दिसली; मात्र अशा प्रकारची पूर्वकल्पना सुरक्षा यंत्रणेला नव्हती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एरवी विरोधी पक्षांकडून आंदोलन किंवा मोर्चा जाहीर झाल्यास संबंधित कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेण्याची कारवाई केली जाते. मात्र, व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यादरम्यान अचानक रस्ता अडविण्याचा प्रयत्न होणे ही बाब चिंताजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर समाजमाध्यमांतून टीका होत आहे.
लोकशाही व्यवस्थेत राजकीय मतभेद आणि निषेध नोंदविण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकंदरीतच, ठाणे मुलुंड चेक नाका येथे घडलेल्या या प्रकारामुळे राज्यातील व्हीव्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेची कार्यक्षमता आणि समन्वय यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे