परिक्षेला पोहचण्यात रस्त्यावर अडचणी उद्भवल्यास वाहतुक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करा.
दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला वाहतुक पोलीस सज्ज झाले आहेत. त्यानुसार, रस्त्यांवर ५४ रायडर्स तैनात केले असुन ट्राफिक कंट्रोल व्हॉटसॲप क्रमांक व ट्राफिक कंट्रोल हेल्पलाईनसह १८ वाहतुक युनिटमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. तरी, परिक्षेला पोहचण्यात रस्त्यावर अडचणी उद्भवल्यास वाहतुक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक (१० वी) आणि उच्च माध्यमिक (१२ वी) शालांत प्रमाणपत्र परिक्षा अनुक्रमे १० फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारी पासुन सुरू होत आहेत. या परिक्षांकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयातील १ ते ५ परिमंडळात इयत्ता १२ वी ची एकुण १२६ केंद्रे तर इयत्ता १० वी ची एकुण २२३ केंद्रे आहेत. या परिक्षा केंद्रांवर परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यांवर कोणत्याही कारणामुळे अडचण उद्भवल्यास ५४ रायडर्स सज्ज ठेवले आहेत. याकरिता विद्यार्थी अथवा पालकांनी वाहतूक विभागाच्या ट्राफिक कंट्रोल हेल्पलाईन क्रमांक 8286300300 व 8286400400 तसेच ट्राफिक कंट्रोल व्हॉटसॲप क्रमांक 7039003866 आणि १८ वाहतुक युनिटमध्येही हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केले आहेत. याशिवाय, नियंत्रण कक्षातही तीन वाहने तैनात असणार आहेत. परिक्षाकाळात रस्त्यांवरील अडचणी संबंधित माहिती मिळताच वाहतूक पोलिसांकडून तातडीने घटनास्थळी पोहचुन वाहतुकीतील अडथळे दूर करीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी मदत केली जाणार आहे.
ही सुविधा केवळ परीक्षा कालावधीसाठी उपलब्ध आहे. परिक्षा कालावधीत पालकांनी तसेच, नागरिकांनीही या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.