ठाणे, प्रतिनिधी
केंद्र सरकारने अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातुन झालेली कामे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याकडे दिलेलं विशेष लक्ष आणि ठाणेकरांच्या मनामध्ये भाजप-शिवसेना महायुतीने मिळवलेले स्थान, या शिदोरीवर ह्या महापालिका निवडणुकीत महायुती अब की बार १०० पार करेल. असा विश्वास राज्यसभेचे मा. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला.
ठाणे महापालिका निवडणुक -२०२६ करीता भारतीय जनता पक्षाच्या वर्तकनगर येथील ठाणे विभागीय कार्यालयात मंगळवारी (ता.०६जाने.) महायुतीच्या “ठाणे निर्धारनामा” चे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी सहस्त्रबुद्धे बोलत होते. या प्रसंगी भाजपचे आमदार संजय केळकर, भाजपचे ठाणे निवडणुक प्रभारी आ. निरंजन डावखरे, शिवसेना (शिंदे गट) राज्य सचिव राम रेपाळे, भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, सुजय पतकी, प्रवक्ते सागर भदे आणि मनाली गायकवाड आदीसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मा. खासदार सहस्त्रबुद्धे यांनी केलेल्या भाजप – शिवसेना महायुती १०० पार करेल या दाव्याचा पुनरुच्चार आमदार केळकर तसेच, शिवसेनेच्या राम रेपाळे यांनी देखील करून ठाणे महापालिकेवर पुन:श्च भगवा फडकणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
भाजप- शिवसेना महायुतीने ठाणे शहरासाठी ५४ कलमी ‘निर्धारनामा’ जाहीर केला आहे. ज्यात शहरात मिनी क्लस्टर योजना राबविण्यासह ठाणेकरांसाठी २४ तास पाणी पुरवठा, नवीन गृहसंकुलांसाठी पाण्याच्या पुनर्वापराचे धोरण जाहीर केले आहे. तसेच, दर तीन महिन्यांनी प्रभागसभा घेऊन प्रभागनिहाय खर्चाचा डिजिटल बोर्ड लावला जाईल. स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक ठाणे साकारण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातुन तलावांचे सुशोभीकरण व पर्यटन सुविधा विकसित केल्या जातील. कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्या बरोबरच शहरात भूमीगत कचरा कुंड्या बसवण्यात येतील.त्याचप्रमाणे दुबार नालेसफाईसह मलनि:स्सारण ऑडिट व कृती आराखडा केला जाईल. शहरासाठी कॅन्सर हॉस्पिटल, एम्सच्या धर्तीवर भव्य रुग्णालय, महिलांसाठी नियमित आरोग्य तपासणी व्हॅन्स, ठाणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने सहा ते आठ भव्य पार्कस, नाट्यगृहे, फिल्म फेस्टिव्हल, स्ट्रीट आर्ट, संगीत महोत्सव, डिजिटल ग्रंथालये आदीसह नवीन स्टेडियम उभारून आयपीएल व आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन केले जाईल. कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख डिजिटल शिक्षणाबरोबरच महापालिका शाळांमध्ये अर्ध-इंग्रजी पद्धती, सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासह टीएमटी सेवेचा दीर्घकालीन कृती आराखडा तयार करण्यात येणार असुन प्रत्येक मेट्रो स्टेशनपासून परिसरात जाण्यासाठी मिनी बसचे नेटवर्क उपलब्ध केले जाईल. आधुनिक पार्किंग स्टेशन आणि ठाणे शहरात इंटर्नल रिंग मेट्रो बनविण्याचा निर्धार महायुतीने व्यक्त केला आहे.
ठाणेकरांना उत्तम पायाभूत सुविधा देण्याकरीता शहरातील १९७ कि.मी. रस्त्यांचे सखोल ऑडिट करून,१० वर्षे टिकतील असे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. पादचाऱ्यांना प्राधान्य असणारे महापालिकेचे स्वतंत्र पदपथ धोरण तसेच फेरीवाला धोरण लागू करणार असुन जुन्या इमारतींच्या पुनर्विकास मंजुरीसाठी एक खिडकी योजनाही राबवण्यात येणार असल्याचा निर्धार महायुतीने व्यक्त केला आहे.