राज ठाकरे यांची एप्रिल २०२२ मध्ये ठाण्यात ‘उत्तर सभा’ घेतली होती. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील चौकात पार पडलेल्या या उत्तर सभेमध्ये राज ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना तलवार भेट दिली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी व्यासपीठावर तलवार म्यानातून काढून हवेत उंचावली होती. या घटनेनंतर नौपाडा पोलीस ठाण्यात राज ठाकरे, अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी येत्या गुरुवारी राज ठाकरे हे ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. एका सभेमध्ये राज ठाकरे यांना तलवार देण्यात आली होती. ती तलवार राज ठाकरे यांनी हवेत उंचावली होती. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते अविनाश जाधव आणि मनसेचे पदाधिकारी रविंद्र मोरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या प्रकरणाची सुनावणी ठाणे न्यायालयात पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडले होते. मशीदीवरील भोंग्याचा त्रास नागरिकांना होत असल्याचे मनसेचे म्हणणे होते. काही ठिकाणी मनसेच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मशीदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलनही केले होते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि मनसेमध्ये वादाचे प्रसंग झाले होते. दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत होत्या.