ठाणे (05) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत त्यापैकी बहुतांश प्रकल्पअंतिम टप्प्यात असून या विकासकामांचे लोकार्पण, वाघबीळ येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन नाट्यगृहाचे भूमिपूजन महापालिका निवडणुकांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने अंतिम टप्प्यातील प्रकल्प 15 डिसेंबरपर्यत पूर्ण करावेत तसेच घोडबंदर सेवा रस्ता जोडणी, अमृत जलवाहिनी आणि महावितरणच्या वाहिन्यांचे स्थलांतरण आदी कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज झालेल्या बैठकीत दिले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक आज (शुक्रवार दिनांक 05 डिसेंबर) आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त (वाहतुक) पंकज शिरसाट, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिका, एमएमआरडीए, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील विकासकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला असून, या निधीच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठाणे शहरातील एकूण 67 विहिरींचे शास्त्रोक्त पध्दतीने पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या विहीरींचे पाणी पिण्यासाठी वापरता येणार आहे. तसेच स्मशानभूमींचे अत्याधुनिक पध्दतीने सुशोभिकरण, पाळीव प्राण्यासाठी स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे डिजीटल ॲक्वेरियम तसेच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ठाणेकरांसाठी प्रत्येक ठिकाणी जॉगिग ट्रॅक तयार करण्यात येत असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
घोडबंदर रोडवर सेवा रस्ता जोडणीचे काम सुरू आहे, एमएमआरडी, विद्युतविभाग, पाणी विभाग, मेट्रो प्रधिकरण आणि वाहतूक पोलीस यांचा समन्वय साधून सेवा रस्ता जोडणीचे काम 15 जानेवारीपर्यत पूर्ण करण्याचे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. घोडबंदररोडवरील वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होवू नये तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे पाच स्कॉड वाहतूक पोलीसांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ठाणे शहरातील 96 टन ओला कचऱ्याचे गायमुख येथील प्रकल्पाच्या माध्यमातून खत तयार केले जात असून हा राज्यातील पहिला खतनिर्मितीचा प्रकल्प असल्याचे सांगत कचरा प्रश्न सोडविण्यासाठी सोलर डस्ट ही संकल्पना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.