ठाण्यातील गायमुख, काजूपाडा आणि फाऊंटेन हॉटेलदरम्यान हे बदल केले जाणार आहेत. ठाणे शहर पोलिसांनी याबद्दलची माहिती आपल्या एक्स हँडलवर काल पोस्ट केली होती. कासरवडवली ट्रान्सपोर्ट सब-डिव्हिझनच्या हद्दीत डांबरीकरणाचे काम होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे 7 तारखेला वाहतूकीत मोठे बदल केले जाणार असल्याचे सांगितले आहे.
ठाणे पोलिसांनी काल ठाण्यात होणाऱ्या वाहतूक बदलांबद्दल महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. 7 डिसेंबरला रस्त्यावर डांबरीकरणाच्या कामांमुळे 24 तासांसाठी महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक वळवण्यात येणार आहे. मध्यरात्री 12 पासून ते रात्री 11.59 पर्यंत हे नियम लागू असतील.
मुंब्रा आणि कळवाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी खारेगाव टोल प्लाझा बंद केला जाणार आहे. या वाहनांसाठी खारेगाव बे ब्रिज मार्गे खारेगाव टोल नाका, मानकोळी आणि अंजुरफाट्यावरून प्रवास करता येणार आहे. तसेच नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना मानकोळी नाक्यावर बंदी घालण्यात आली असून, त्यांनी अंजुरफाट्यावरूनच प्रवास करावा लागणार आहे.
हलक्या वाहनांसाठी, अधिसूचनेत असे म्हटले आहे की ठाण्याहून घोडबंदरकडे जाणारी हलकी वाहने घोडबंदर–ठाणे रस्त्यावरील गायमुख चौकी येथून चुकीच्या बाजूने पुढे जातील आणि नंतर फाऊंटन हॉटेलसमोरील कटमार्गे इच्छित स्थळी जातील.
घोडबंदर रोडवरील मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक वळवण्यात येणार असून Y जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन बंद करण्यात येणार आहेत. मुंबई आणि ठाण्यावरून येणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोल प्लाझा, मानकोळी, अंजुरफाटा आणि नाशिक रोडच्या दिशेने वळवले जाणार आहे. किंवा, याशिवाय ही वाहने कापूरबावडी जंक्शनवरून काशेली आणि अंजुरफाट्यावरूनही प्रवास करू शकतात.