वाहतुक नियमांची जनजागृतीसाठी ठाण्यातील शाळांमध्ये कल्पक प्रकल्पांसह विविध स्पर्धांचे आयोजन
ठाणे,ता. 4 डिसेंबर २०२५
वाढत्या अपघातांना आळा बसावा तसेच, वाहतुक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानासाठी ठाणे शहर वाहतुक विभागाने यंदा “एक पाऊल पुढे” टाकले आहे. नववर्षात दिनांक २६ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये होणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानात ठाण्यातील शाळांना सहभागी करून घेण्यात आले आहे. या अनुषंगाने ठाणे वाहतूक विभागाच्यावतीने आरएसपीच्या विद्यार्थ्यांसाठी विभागवार विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धकांमधील पहिल्या तीन विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती ठाणे शहर वाहतुक विभागाकडुन देण्यात आली.
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ च्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभाग व ठाण्यांमधील शाळांचे मुख्याध्यापक व आरएसपी शिक्षकवृंद यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतुक उपायुक्त कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला वाहतुक उपायुक्त पंकज शिरसाट, जिल्हा आरएसपी समन्वयक श्री. मनिलाल शिंपी, श्री.जितेंद्र सोनवणे, श्री.दिगंबर बेंडाळे व श्री. विनोद शेलकर व श्री. माणिक पाटील, तसेच शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. यावेळी रस्ता सुरक्षा अभियान आणि वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी सर्व शाळांमध्ये वाहतूक विषयक जनजागृती करणे व विद्यार्थ्यांमध्ये वाहतूकीबाबत शिस्त अंगी बाणावी यासाठी ठाणे वाहतूक विभाग यांच्यावतीने आरएसपीच्या विद्यार्थ्यांच्या विभागवार स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये, भविष्यातील वाहतूकीचे नियोजन या विषयावर प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांकडून प्रोत्साहनपर कल्पक प्रकल्प (Project) विषयक स्पर्धा घेण्यात येणार असुन प्रत्येक शाळेतून दोन उत्कृष्ट प्रकल्पांची निवड केली जाणार आहे. या कल्पकता स्पर्धेसह अन्य विविध स्पर्धामध्ये आणि परेड संचलनात पहिले तीन (प्रथम, द्वितीय, तृतिय) क्रमांक मिळविणाऱ्या संघांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
अशा आहेत विद्यार्थ्याकरीता स्पर्धा
ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व शाळांमध्ये विभागवार स्पर्धा होणार आहेत. इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यां करीता चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये १) ड्रंक अँन्ड ड्राईव्ह,२) सिग्नल जंपींग, ३) विदाऊट हेल्मेट, ४) ब्लाईंड स्पॉट,५) मोबाईल टॉकींग असे चित्रकलेचे विषय असून प्रत्येक शाळांमधून ५ चित्रे मागिवली आहेत. या सर्व चित्रांचे प्रदर्शन दि.२६ जाने. ते ३१ जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये साकेत मैदान येथे भरवण्यात येणार असुन निवडक चित्रे वाहतूक पोलीस २०२६ च्या दिनदर्शिकेमध्ये प्रदर्शित केली जाणार आहेत. तर, प्रत्येक विभागातून दोन मुले, दोन मुली व एक बँड पथक अशी २५ पथके परेड संचलन करणार आहेत. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी साकेत मैदानात होणाऱ्या संचलनात आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या सांगता समारोहामध्ये शाळांचे हे परेड संघ बँड पथकासह सहभागी होणार आहेत.
आर.एस.पी.शिक्षक प्रशिक्षण वर्गासाठी नोंदणी
ठाणे शहर वाहतुक विभागाचे पोलिस उप आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या निर्देशानुसार आणि देविदास महाजन, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद (माध्यमिक), डॉ. बाळासाहेब राक्षे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या मार्गदर्शनाखाली आर.एस.पी. शिक्षक अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक ५ डिसेंबर २०२५ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी नाव नोंदणीसाठी शिक्षकांची माहिती https://forms.gle/CgkcKU3Cqnx6fhLEA ह्या गुगल लिंकमध्ये भरून पाठवावी.
अधिक माहितीसाठी : प्रशिक्षण प्रमुख दिलीप स्वामी – 8097212606 आणि मणिलाल शिंपी – 7977253305 यांच्याशी संपर्क करावा.
“शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना वाहतूकीच्या नियमांची माहिती व्हावी व भविष्यात जबाबदार नागरीक या नात्याने त्यांच्यात वाहतूकीबाबत शिस्त निर्माण व्हावी यासाठी वाहतुक विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. तरी, जास्तीत जास्त शाळांनी या अभिनव स्पर्धामध्ये सहभाग दर्शवावा.