ठाणे प्रतिनिधी:- शहरात वाढत्या उष्णतेमुळे वन्यजीवांचे वर्तन बदलत असल्याचे चित्र समोर येत आहे. तापमानात मोठी वाढ होत असल्याने जमिनीवर सरपटणारे प्राणी थंड व ओलसर जागांच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
अशातच मंगळवारी ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील ढोकाळी येथील एका गृहसंकुलाच्या बागेत सुमारे तीन फूट लांबीचा अजगर आढळून आला. गार्डनमधील ओलसर व थंड ठिकाणी हा अजगर विसावलेला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. अजगर दिसताच परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती तत्काळ स्थानिक सर्पमित्र संस्थेला देण्यात आली. माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत शिताफीने आणि काळजीपूर्वक अजगराला पकडले. त्यानंतर कोणतीही इजा न होता त्या अजगराला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे अशा प्रकारच्या घटना पुढील काही दिवसांत वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अशा प्रसंगी त्वरित सर्पमित्र किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे..