आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश; किशीन महल सोसायटीला बजावलेली चुकीची नोटीस मागे घेण्याचे निर्देश
ठाणे: ठाण्यातील किशीन महल सहकारी गृहनिर्माण संस्थेला महसूल विभागाने नाहक बजावलेल्या चुकीच्या नोटिशीप्रकरणी राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावणकुळे यांनी आज कडक पवित्रा घेतला. या प्रकरणात ठाण्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी (Collector of Stamps) संजय चव्हाण यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याचे आदेश देत, त्यांची तात्काळ बदली करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी मंत्रालयातील बैठकीत दिले. तसेच, संबंधित वादग्रस्त नोटीस त्वरित मागे घेण्याचे स्पष्ट आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
विधानसभेत गाजला प्रश्न
किशीन महल सोसायटीच्या स्वयंपुनर्विकासात (Self-Redevelopment) महसूल आणि मुद्रांक विभागाकडून तांत्रिक अडचणी उभ्या करून नाहक अडथळे निर्माण केले जात असल्याचा विषय स्थानिक आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला होता. महसूल विभागाच्या अशा धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या पुनर्विकासाच्या स्वप्नांना खीळ बसत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच शासनाला स्वयंपुनर्विकासाच्या विषयावर गांभीर्याने आणि सकारात्मक विचार करणे भाग पडले आहे.
मंत्रालयात विशेष बैठक
आमदार संजय केळकर यांच्या विशेष पुढाकाराने महसूल मंत्र्यांच्या दालनात आज तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत किशीन महल सोसायटीला देण्यात आलेली नोटीस ही नियमाबाह्य आणि चुकीची असल्याचे समोर आले. महसूल मंत्र्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे
या कायदेशीर लढाईत विकासक मार्गदर्शक श्री. विद्याधर वैशंपायन यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कायदेशीर बाबींची अचूक मांडणी आणि तांत्रिक पुरावे सादर करून त्यांनी प्रशासकीय चुका चव्हाट्यावर आणल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच सोसायटीला हा मोठा विजय मिळवता आला आहे.
या निर्णयामुळे ठाण्यातील पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रशासकीय अरेरावीला चाप बसल्याची भावना व्यक्त होत आहे.